How to get perfect sleep Ayurvedic Blog

निद्रा (Sleep) – आयुर्वेदातील विचार

!! श्रीः !!

निद्रा / झोपेविषयी (Sleep) आयुर्वेदातील विचार

आयुर्वेदामध्ये आहार ,निद्रा व ब्रह्मचर्य हे तीन उपस्तंभ सांगितले आहेत . शरिर व मन दोन्ही स्वस्थ –निर्विकार –रोगरहित ठेवायचे असल्यास या तिन्हींचा योग्य समन्वय हवा. या लेखात आपण निद्रा ( झोप ) या विषयाची आयुर्वेदातील माहिती घेऊ.

मनुष्य कधी झोपतो ?

“यदा तु मनसि क्लान्ते कर्मात्मानः क्लमान्विताः ! विषयेभ्यो निवर्तन्ते तदा स्वपति मानवः !!”

माणसाचे मन काम करता करता थकुन जाते तसेच पंच ज्ञानेंद्रियेसुद्धा ( शब्द ,स्पर्श ,रुप ,रस,गंध) आपापल्या कामापासुन थकुन अलग होतात तेव्हा मनुष्य झोपी जातो.

आपण रोज का झोपी जातो किंवा झोपेची का गरज आहे याचा विचार वरील झोपेच्या व्याख्येत सापडतो.

मेंदूच्या सुस्थितीसाठी झोप आवश्यक-

आपल्या शारिरिक व मानसिक हालचालींची सर्व केंद्रे मेंदुमध्ये आहेत.या मेंदुमधील केंद्रांच्या सुस्थिति व समन्वयासाठी आपणास झोपेची नितांत आवश्यकता आहे. तसेच आपली पचनक्रिया व रक्ताभिसरण क्रिया चांगले रहाण्यासाठीसुद्धा झोप गरजेची आहे.

झोपेचे फायदे –

सुखपुर्वक झोप घेतल्याने शरिराचे व मनाचे आरोग्य चांगले राहते. शरिराचे यथायोग्य पोषण होउन बळ व ज्ञानेंद्रियांमध्ये शक्ती निर्माण होते. शरिरातील रस रक्त मांस हाडे शुक्र इ.सर्व धातुंची सुयोग्य वाढ होउन जीवन सुखकर होते.

झोप न घेण्याचे तोटे –

काही कारणास्तव आपण झोप न घेतली अथवा कमी घेतली तर शरिर व मनाचे आरोग्य बिघडते . शरिरातील धातुंचे बळ कमी हो उन थकवा,निरुत्साह ,नपुंसकता ,विविध प्रकारचे आजार व पंचज्ञानेंद्रियांची ग्रहणशक्ती कमी होते व क्वचित्प्रसंगी मृत्युही ओढवतो.

झोपेसंबंधी साधारण नियम –

१) दुपारी / जेवणानंतर लगेचच झोपु नये –

असे केल्यास कावीळ , भुक न लागणे ,शरिर जड होणे ,सुज येणे , सर्दी , खोकला इ. कफाचे विकार ,डोकेदुखी ,ताप ,त्वचेचे आजार ,मधुमेह ,ह्रदयाचे विकार होण्याचा संभव असतो.

२) रात्री जागरण करु नये –

असे केल्यास शरिरामध्ये वात वाढुन वाताचे आजार होतात. शरिर व त्वचा रुक्ष होते .उष्णतेचे विकार ,सांध्यांचे आजार .डोळ्यांचे विकार ,केस गळणे ,डोकेदुखी , थायरॉईडचा त्रास स्त्रियांमधील हार्मोन्सचे विकार ,पित्ताचे आजार ,अजीर्ण ,आतड्यांचे आजार ,बी.पी. इ. आजार होऊ शकतात.

३) दिवसा कोणी झोपावे ? –

वातप्रकृतीचे रोगी , गायक , खुप बौद्धिक काम करणारे ,लहान मुले ,वयोवृद्ध व्यक्ती ,खुप शारिरीक श्रम करणारे ,थकलेले , अबला( जी स्त्री थकलेली आहे) ,दम्याचे रुग्ण , जुलाब वा अजीर्णाने त्रस्त रुग्ण , अपघातामध्ये दुखावलेले , प्रवास करुन थकलेले , मनाने चिंता ,क्रोध करणारे इ. व्यक्ती दिवसा झोपु शकतात.

४) वरिल व्यक्तींव्यतिरिक्त इतरांना दिवसा झोपायचे असल्यास खुर्चीवर बसुन झोप घ्यावी.

५) तीव्र उन्हाळ्यात ( १५ एप्रिल ते १५ जुन- ज्याला ग्रीष्मॠतु म्हणतात) सर्व प्रकारचे रुग्ण ,स्वस्थ व्यक्ती दिवसा बिनधास्त झोपु शकतात . त्यांना कोणताही त्रास होत नाही.

६) काही कारणास्तव रात्री जागरण झाले असल्यास , रात्रपाळीचे कामावरुन आल्यानंतर दुसरे दिवशी सकाळी “ दुपारच्या जेवणापुर्वी व रात्री जागरण झाले असेल त्याच्या निम्मा वेळ” झोप घ्यावी.

७) झोपण्यापुर्वी थंड पाणी अगर थंड दुध पिऊ नये. असे केल्यास कानाचे ,डोळ्याचे दोष निर्माण होतात .

८) अतिनिद्रा सुद्धा कफाचे व पित्ताचे विकार निर्माण करुन स्मरणशक्ती कमी होणे ,वजन वाढणे ,मधुमेह ,रक्तदाबाधिक्य असे विकार होतात.

झोपेसंबंधी वरिल नियमांचे पालन केल्यास शरिर व मन स्वस्थ राहते.

अन्यथा कफाचे पित्ताचे विकार निर्माण होऊन “निद्रानाश” सारखा भयंकर आजार निर्माण होऊ शकतो.

डॉ. नितिन थोरात ©
MD(Ayu)- Ras Shastra
Mob.9867980769
www.suvarnarasayan.com
https://www.facebook.com/suvarnarasayan/
https://www.youtube.com/channel/UCplVlhos5Wa2Gh0l_xWoSxA?view_as=subscriber