पुरुष वंध्यत्व(Male Infertility) – आधुनिक निदान परिक्षण व आयुर्वेदिय चिकित्सा

आयुर्वेदामध्ये काय-बाल-ग्रह-उर्ध्वांग-शल्य-द्रष्टा-जरा आणि वृषान् असे आठ प्रकारचे विभाग सांगितले आहेत .त्यापैकी शेवटच्या विभागामध्ये अतिशय महत्त्वाचा असलेला वंध्यत्व हा विषय येतो.यामध्ये स्त्री वंध्यत्व व पुरुष वंध्यत्व हे उपविषय येतात. स्त्री वंध्यत्व ह्या विषयावर अनेक संशोधने, विचार उपलब्ध आहेत पण पुरुष वंध्यत्व(MALE INFERTILITY)  हा विषय मात्र फक्त संभोग / मैथुन क्षमता या मर्यादित लक्षणाभोवतीच प्रामुख्याने चिकित्सला जातो. आज आपण प्रायः प्रजानिर्मितीमधील पुरुष वंध्यत्वामुळे येणा-या समस्यांवर विचार करणार आहोत.

यापुर्वी आपण एक तत्व जरुर जाणले पाहीजे ते म्हणजे जो पुरुष मैथुनक्षम आहे तो प्रजोत्पादनासाठी सक्षम असेलच असे नाही व जो प्रजोत्पादनक्षम असेल तो मैथुनक्षम असेलच असे नाही. आज आपण पुरुष वंध्यवाचा विचार करत असताना मैथुनक्षम असलेले परंतु प्रजोत्पादनक्षम नसलेले पुरुष वंध्यत्व अभ्यासणार आहोत.

मैथुन व प्रजोत्पादन हि शुक्रधातुची प्रमुख कार्ये आहेत.

सुश्रुताचार्यांनुसार “ शुक्रं धैर्यं च्यवनं प्रीती देहबलं हर्षं बीजार्थं च !! ही शुक्र धातुची कार्ये आहेत. आयुर्वेदिय तत्वांनुसार शुक्र धातुची उत्पत्ती ही रस रक्तादी धातुंच्या उत्तरोत्तर धातु परिपोषण क्रमाने होत असल्याने शुक्र धातु हा सर्व धातुंचे सारभाग म्हणुन व्यकत होतो. तसेच शुक्र धातु हा वीर्य स्वरुपात व्यक्त होत असल्याने व तो सारभुत असल्याने त्याचे प्रमाण इतर धातुंच्या सापेक्षतेने अतिशय स्वल्प आहे. तसेच शुक्रवह स्रोतसाचे स्थान “वृषणौ मुलं शेफश्च !!” असले तरी हे प्रायः स्थानिक शुक्राच्या संदर्भात लागु पडते असे दिसते. सार्वदेहीक शुक्र मात्र, धैर्यं च्यवनं हर्षं…इ.कार्यातुन व्यक्त होते. त्यामुळेच वृषणामध्ये तयार झालेल्या शुक्राचा अत्याधिक व्यय झाल्यास मात्र धैर्यं,च्यवनं,हर्षं…ही कार्ये विकृत होउन त्या पुरुषाचा आत्मविश्वास कमी होउन भीति वाटणे, स्मृतीमांद्य, दौर्बल्य, कंप, ध्वजोत्थान न होणे इ. लक्षणे निर्माण होतात.

या लेखात आपण केवळ प्रजोत्पादन संदर्भातिल पुरुष वंध्यत्वाचा विचार करणार आहोत.

सुश्रुतांनुसार शुक्रधातु, “ स्फटिकाभं द्रवं स्निग्धं मधुरं मधुगन्धि च ! शुक्रमिच्छंति केचित्तु तैलक्षौद्रनिभं तथा !! सु,शा.२ या गुणधर्मांचा असला तरी सध्याच्या कालानुरुप विचार केल्यास प्रत्यक्षपणे पुरुषामधील Semen Analyasis ( वीर्य तपासणी ) केल्यासच त्यातील शुक्राणुंची संख्या (Quantity) , त्यांची चलनक्षमता(Motility) , विकृत शुक्राणुंचे प्रमाण ( Dead/abnormal sperms) , वीर्याचे प्रमाण (Semen Quantity) ,मधुरता असणे/नसणे (Fructose) , द्रवता ( Liquidity) ,सौम्यता ( PH –Alkaline/Acidic) इ. बाबींचा विचार करुनच त्या पुरुषाची वंध्यता ही तपासली जाते. अधिदैविक कारणांचा विचार वगळता अधिभौतिक कारणांचा विचार करुन चिकित्सा करण्यासाठी Semen Analyasis या आधुनिक मापदंडाचे साहाय्य घेतल्याशिवाय “पुरुष वंध्यत्व” या विषयाच्या खोलात जाता येत नाही.

एकदा का वीर्य तपासणी केली कि त्यातील निरिक्षणे,जसे की

Oligospermia (शुक्राणुंचीसंख्या कमी )

Asthanospermia ( शुक्राणुंचे चलनवलन कमी असणे )

Teratospermia ( विकृत शुक्राणु असणे)

Azoospermia ( शुक्राणु अजिबात नसणे) ,

Fructose Absent , Liquification time variations

इ. निरिक्षणांनुसार त्यापुढील अद्ययावत निदान करण्यासाठी पुढिल परिक्षणे जसे की , Scrotal Sonography , Colour Doppler , Testicular Biopsy ( to detect sperm maturation arrest / spermatogenesis ) इ. करुन पुरुष वंध्यत्वाचे निश्चित निदान आधुनिकरित्या करावे लागते.  या तपासण्यांद्वारे रचनात्मक विकृतींचा अंदाज बांधला जातो मात्र कार्यात्मक विकृति शोधण्यासाठी त्या पुरुषामधील रक्ततपासणी करुन रक्तामधील FSH ,LH , Testesteron इ. Hormones तपासुन घेउन प्रजनन संस्थेच्या कार्यात्मक विकृतीचा अंदाज घेतला जातो. एकदा का या पद्धतींचा निश्चित निदानासाठी उपयोग करुन घेतला कि मग त्यानुसार या कारणांना आयुर्वेदिय निदानाची कसोटी लावुन संप्राप्ती लावता येते. अगदीच फक्त आयुर्वेदीय निकश लावुन पुरुष वंध्यत्व तपासु लागल्यास चिकित्सेत अपयश येण्याचा धोका असतो. कारण रसात् रक्तं ततो मांसं …. या संप्राप्तीनुसार शुक्र धातुची माहीती घेउन पुरुष वंध्यत्व प्रत्यक्षपणे तपासता न आल्यामुळे चिकित्सा करण्यास असमर्थता येउ शकते. म्हणुन आधुनिक तपासण्यांचा आधार घेउन त्यानुसार आयुर्वेदिय चिकित्सा केल्यास यशाची परिणामकारकता अधिक जाणवते.

त्यासाठी आपण प्रथम प्रजोत्पादनासाठी उपयोगी शुक्राणु निर्मितिची आधुनिक शास्त्रानुसार प्रक्रीया समजुन घेउ म्हणजे मग अंततः त्याअनुसार चिकित्सा करण्यास रुग्ण घ्यायचा का त्याला पुढील अत्याधुनिक उपचारांसाठी पाठवायचे ही सीमारेषा निश्चित करता येते व शास्त्रहानी टाळता येऊ शकते.

त्यासाठी आधुनिक शास्त्रानुसार शुक्राणुनिर्मिति प्रक्रिया थोडक्यात समजुन घेऊ….

TESTIS — SEMINIFEROUS TUBULES — GERM CELLS( SPERMATOGONIA) —PRIMARY SPERMATOCYTE — SECONDARY SPERMATOCYTE –SPERMATIDS —SPERM MATURATION ( SPERMATOGENESIS) —SPERMATOZOOA

वरिलप्रमाणे मेंदुमधुन स्रवलेले कार्यकारी तत्व ज्याला आपण हॉर्मोंस म्हणतो, ती रक्ताद्वारे वृषणापर्यंत पोहोचुन वृषणामधील संरचनेमधील घटकांवर नैसर्गिक प्रक्रीया करुन यथावकाश शुक्राणु निर्माण करतात . असे निर्माण झालेले शुक्राणु विर्यामध्ये मिसळुन संभोगप्रक्रीयेद्वारे स्त्रीच्या योनीभागातुन प्रवेश करुन स्त्रीबीजाशी संयोग करुन गर्भ निर्मिति करतात.

प्रथमतः मुलतः रुग्णाची वीर्य तपासणी (semen Analysis) करुन तद अनुषंगाने दोष आढळल्यास पुरुष प्रजनन संस्थेची नैसर्गिक रचना  तपासण्यासाठी Whole Abdominal Sonography  व  Scrotal Sonography / Colour Doppler या तपासण्या करुन घ्याव्यात .

१) संपुर्ण पोटाची सोनोग्राफी केल्यामुळे पुरुषाच्या दोन वृषणांपैकी एखादे अथवा दोन्ही वृषण पोटाच्या बाहेर खाली वंक्षणाच्या ठिकाणी न आल्याचे आढळल्यास त्याठीकाणी आयुर्वेदिय उपचार न करता शस्त्रक्रीया करुन नंतर आयुर्वेदीय उपचार केल्यास चिकित्सा फलद्रुप होऊ शकते. तसेच वृषणाचा आकार लहान आढळल्यास (Male Hypogonadism) त्यानुसार त्याच्या कारणांचा शोध घेऊन आयुर्वेदिय चिकित्सा केल्यास हमखास यश मिळते.

२)तसेच त्याठिकाणी रक्तवाहीन्यांमध्ये विकृती (Varecocele / testicular Cyst) आढळल्यास त्यानुसार आयुर्वेदिय चिकित्सा करुन पुरुष वंध्यत्व जाऊ शकते.

३)रुग्णाच्या वीर्य तपासणीमध्ये अजिबात शुक्राणु न आढळल्यास तसेच रक्तवाहिन्यांमध्येही विकृति न आढळल्यास पुढील कारणे शोधण्यासाठी Testicular Biopsy करुन शुक्राणु निर्मिति प्रक्रियेतील अडथळे जसे की Sperm maturation arrest आहे की नाही हे पाहता येते व त्यानुसार आयुर्वेदिय चिकित्सा करता येऊ शकते.

याबरोबरच प्रजनन संस्थेच्या कार्यप्रणालीमधील दोष शोधण्यासाठी रुग्णामधील  FSH ,LH , Testosteron Hormones तपासुन घ्यावे लागतात. जेणेकरुन वृषणातील शुक्राणु निर्मिति प्रक्रीया योग्य आहे की नाही याचा अंदाज बांधता येतो.

उदा.  १) जर रुग़्णामधील testosteron Hormone कमी असेल तर पुरुष प्रजनन संस्थेचा विकास यथायोग्य दिसत नाही अशा रुग्णांमध्ये त्या पुरुषाचे स्तन स्त्रीयांप्रमाणे मोठे दिसु लागतात व शुक्राणु निर्मिती प्रक्रीयापण ठप्प होते. यालाच Gynecomastia असे म्हणतात. सुश्रूताचार्यांनी शुक्रवह स्रोतसाचे मुलस्थान “ शुक्रवहे द्वे तयोर्मुलं स्तनौ वृषणौ च…!! असे का सांगितले असावे? याचे उत्तर मिळते. अशा रुग्णांमध्ये पुष्पधन्वा रस , वानरी गुटिका यासारखी आयुर्वेदिय औषधे आधुनिक उपचारांपेक्षा अनेक पटिने चांगली उपयोगी पडतात .

२) तसेच त्या रुग्णामध्ये जर FSH Levels  वाढलेले असतील तर त्याच्या दुष्परिणामाने Testosteron Hormon ची रक्तातील मात्रा कमी होऊन Spermatogenesis Process न होऊन शुक्राणु निर्माण न झाल्यामुळे पुरुष वंध्यत्व निर्माण होते . या रुग्णांमध्ये प्रथमतः दोषांच्या वृद्धी / -ह्रास यानुसार शोधन देऊन दशमुलारिष्ट ,सारस्वतारिष्ट , वानरी गुटीका , चंद्रप्रभा वटी इ. चिकित्सा पर्याय वापरल्यास निश्चित फायदा होतो.

३) तसेच Azoospermia चे कारण शोधताना केलेल्या Testicular Biopsy मध्ये Sperm maturation Arrest असे निरिक्षण आढळल्यास त्या रुग्णामध्ये पुर्वी राजयक्ष्मा ,Mumps, Cancer या सारख्या दुर्धर आजारांवर घेतलेल्या आधुनिक उपचारांच्या दुष्परिणामांची चाचपणी करुन आयुर्वेदीय उपचार करावे लागतात. (संदर्भ् – शुक्रवाहिनी दुष्यंति शस्त्रक्षाराग्नीभिस्तथा !! च. वि. ५/१९ )

समजा प्रजननसंस्थेच्या संदर्भात वरील दोन्ही, रचनात्मक व कार्यात्मक विकृति तपासण्यांमध्ये काहीहि दोष न आढळल्यास व रुग्णामध्ये तरीही Azoospermia असल्यास मात्र शुक्राणु तयार होत असुनही शुक्राणु वहन करणा-या वाहीनीमध्ये (Vas Deference) अवरोध असल्याचे निदान करणे सोपे जाते. अशा रुग्णांमध्ये प्रायः पुर्वी राजयक्ष्मा / Mums Orchitis झाल्याचा इतिहास आढळतो आणि तो ही नसेल तर रुग्णाला IVF साठी जाण्याचा सल्ला दिला तरी चालेल जेणेकरुन रुग्णाचे हित साधले जाईल.

आता आपण वरिल प्रमाणे निदान केल्या गेलेल्या प्रजनन अक्षम पुरुष वंध्यत्वाची आयुर्वेदीय चिकित्सा पाहु.

  • Oligospermia- यामध्ये शुक्राणुंची संख्या अपेक्षेपेक्षा कमी असते. याची आयुर्वेदानुसार कारणमिमांसा शोधावी लागते.

रुग्ण क्र. १ – अ.ब.क. वय -२७ वर्षे /पुरुष – व्यवसाय –आचारी(सतत ऊष्णतेजवळ काम)

Sperm Count- 1-2 mill/ml –Motility – 10-20% /Fructose +ve/ PH-Acidic

या रुग्णामध्ये इतर आयुर्वेदिय आहार विहारादी परिक्षणे करुन निदान केले. शुक्राल्पता हे लक्षण त्याच्या मागील ७ वर्षाच्या “आचारी” या व्यवसायाशी निगडीत असल्याचे निश्चित केले. दिवसातील भरपुर वेळ हा उष्ण वातावरणात असणे स्वाभाविक होते. निसर्गाने वृषण हा अवयव पोटाच्या बाहेर ठेवण्यामागे अनेक हेतु आहेत. वृषणाचे तपमान हे पोटाच्या आतील तपमानापेक्षा 2 ते 2.5 डिग्री सेल्सियसने कमी असते. आयुर्वेदीय शास्त्रानुसारसुद्धा “शुक्रं सौम्यं….” असे सांगितले आहे . त्यानुसार प्रथमतः रक्तामधील तेज तत्वाचे नियमन करण्यासाठी परिपाठादी काढा वापरल्यामुळे उत्तरोत्तर धातुमधील व पर्यायाने शुक्र धातुमधील उष्णता (तेजतत्त्व) कमी होऊन नंतर शुक्रवर्धक औषधे जसे की वानरी गुटिक़ा ( भै.रत्नावली) , अपत्यकर घृत ( च.चि. २) प्रवाळ्युक्त गुलकंद , वाळा सरबत इ. वापरुन तीन महीन्याच्या चिकित्सेनंतर Sperm count- 80 mill/ml / Motility -70% / PH-alkaline असे परिणाम प्राप्त झाले व त्याच महिन्यात त्याच्या पत्नीला गर्भधारणा झाल्याचे पण समजले. आज या गोष्टीला १८ वर्षे झाली .

 

  • Asthenospermia- यामध्ये शुक्राणुंची चंचलता कमी झालेली असते. याची आयुर्वेदिय कारण मिमांसा करत असताना वरिल उदाहरणामधील ऊष्णतेजवळील सततचे काम हा हेतु तर आहेच पण त्याचबरोबर अव्यायाम, सतत थंड पदार्थांचे सेवन ,कफकारक आहार विहार , अत्यंम्बुपान,अध्यशन इ.कारणे तपासुन पहावीत.

रुग्ण क्र. २ अ.ब.क. वय- ३५ वर्षे /पुरुष – व्यवसाय – आय टी जॉब

Semen Analysis – Count-40 mill/ml / Motility -5% /Fructose +ve / PH-Alkaline /Abnormal sperms ++

या रुग्णामध्ये सतत थंड वातावरणात बसुन काम , सकाळी उठुन भरपुर पाणी पिणे , व्यायाम न करणे, मधुर रस प्रीती , या कारणांचा प्रामुख्याने विचार करुन लघुसुतशेखर , गोखरु काढा , आरोग्यवर्धिनी , चंद्रप्रभा वटी , मकरध्वज वटी इ. आयुधांचा कौशल्याने वापर केला असता तीन महीन्यांनंतर  Count-110 mill/ml /Motility -65% झाल्याचे आढळले.

वरील दोन्ही प्रकारच्या पुरुष वंध्यत्वामध्ये सार्वदेहिक दोषांचा विचार करुन चिकित्सा केली म्हणुन अपेक्षित परिणाम मिळाला. परंतु प्रत्येक वेळी हीच कारणे असतील असे नाही. काही रुग्णांमध्ये मागील आयुष्यात राजयक्ष्मा , जीर्ण आम्लपित्त , जीर्ण ग्रहणी विकार , तसेच चालु आयुष्यात रक्तदाबासाठी आधुनिक उपचार घेणे या कारणांचा विचार करुन तद्नुषंगिक उपचार करावे लागतात. मग त्यासाठी सुवर्ण सुतशेखर , सुवर्ण मालिनीवसंत , सुवर्ण पर्पटी वटी इ सुवर्ण कल्पांचाही योजना करावी लागते.

 

  • Varecocele – मुळे शुक्राणुंची संख्या कमी झालेली असणे. या रुग्णांमध्ये अतिव्यायाम ,अतिहस्तमैथुन, अतिव्यवाय , विकृत / अयोनीव्यवाय , मुखमैथुन इ असामान्य पद्धतिने केलेल्या गोष्टींमुळे वृषणाच्या ठिकाणच्या रक्तवाहिन्यांवर दाब निर्माण होऊन सिराज ग्रंथी तयार होतात. तेथील रक्तप्रवाह कुंठीत परिस्थितीत राहील्याने Spermatogenesis साठी लागणारी यंत्रणा व्यवस्थित काम न करु शकल्याने अशा रुग्णांमध्ये Oligospermia / Azoospermia/ Asthanospermia निर्माण होतो व अस्थायी वंध्यत्व येते.

रुग्ण क्र.-३ अ. ब. क. वय -३६ वर्षे/ पुरुष आय टी प्रोफेशनल

B/L Varecocele-Grade 2 in Rt & Grade 3 in Lt Testis-USG-18-01-2019 , Semen analysis on 22/01/2019 , count-100mill/Fru+ve/Alkaline/motility 5%-Asthanospermia

मल प्र. –स्त्यान पिच्छिल –आध्मान

वरील रुग्णामध्ये वृषणाच्या प्रदेशात ८ जळवा लावुन पुढील तीन महीन्यात २ वेळा रक्तमोक्षण केले. तसेच मधल्या काळात गंधर्वहस्त्यादी तेल ( Castor Oil) बाह्य संवाहनासाठी दिले. तसेच अभ्यंतरतः इतर शुक्रपोषक औषधे जसे की धातुपौष्टिक वटी( धुतपापेश्वर) चंद्रप्रभा , गंधर्व हरितकी वटी व दशमुलारिष्ट ही औषधे यथायोग्य वापरली . अशी तीन महीने चिकित्सा केल्यानंतर चौथ्या महीन्यात रिपोर्ट करायची गरजच भासली नाही . त्याच महिन्यात त्यांच्या सौभाग्यवतींची युपीटी पॉझिटीव्ह आली.

हा आनंद फक्त आयुर्वेद चिकित्साच देउ शकते.

 

Azoospermia – या अवस्थेत रुग्णाच्या वीर्यतपासणीमध्ये शुक्राणु अजिबात मिळत नाहीत.याच्या कारणांचा शोध घेताना अनेकानेक बाबी तपासुन पहाव्या लागतात. पुर्वाश्रमीचा राजयक्ष्मा व त्याची आधुनिक चिकित्सा, गालगुंड या व्याधीमुळे वृषणाला आलेल्या सुजेचा इतिहास , वृषण उदराच्या पोकळीत असणे (Undescended Testis) ,Increased FSH Levels , Low Testosteron Levels , Maturation Arrest in Biopsy इ. अनेक कारणांप्रमाणेच अतिव्यायाम ,अतिव्यवाय , अतिकटू आहार सेवन ( दररोज जेवणात ५ -६ कच्या हिरव्या मिरच्या खाणे) , अतिधुम्रपान या कारणांचा विचार तर करावा लागतोच पण जरी वरील कोणतेही कारण नसताना शुक्राणु अजिबात नसतील तर चरकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे दुष्ट शुक्रामुळे निर्माण होणारा गर्भ हा.. “ शुक्रस्य दोषात् क्लैब्यं अहर्षणम् ! रोगी वा क्लीबं अल्पायु विरुपं वा प्रजायते !!” च.सु. २८/१८  या पद्धतीने दुष्ट शुक्रामूळे तयार झालेला असल्याने अशी व्यक्ती वंध्य /क्लीब म्हणुन जन्माला येते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये एकुण सारासार विचार करुन कारणारुप चिकित्सा केल्यास काही रुग्णांमध्ये नक्कीच आयुर्वेद चांगले काम करु शकतो.

रुग्ण क्र.४ अ.ब.क.  वय-२९ वर्षे /पुरुष – व्यवसाय – रुग्णालयात नोकरी (डॉक्टर)

Semen Analysis – count-00 mill/ml /No Motility/No abnormal sperms /Fructose +ve / PH –Acidic / Coitus/Erection Normal / आहारतः – अत्यंत कटु रस सेवन ( हिरव्या मिरच्या दररोज / ठेचा ) चहा + सिगारेट +++( दिवसातुन १० -१२ वेळा) –मल प्र.-स.का.

चीडचीडेपणा / तृष्णा / अतिस्वेदप्रवर्तन / गोड बिल्कुल आवडत नाही/ सर्वांग औष्ण्यप्रचीती –कायम / Suffocation in humid condition /all Time needs air conditioned climate

सदर रुग्णाचे शरिर संहनन उत्तम होते त्यामुळे उष्णतेच्या /रक्तगत पित्तवृद्धीची इतर सार्वदेहिक  लक्षणे नव्हती. परंतु तृष्णा हे लक्षण होते. तदनुषंगाने सुरुवातीला रक्त धातुवर औषधोपचार सुरु केले. सुरुवातीला रक्तपाचक , वासागुडूची घन वटी परीपाठादी काढा चंद्रप्रभा वटी चंद्रकला रस यासारखी रक्तपित्ताची चिकित्सा ३ -४ महीने करुन नंतर शुक्रपोषक औषधे – वानरी गुटीका ( भै. रत्नावली पाठ) स्वतः तयार करुन दिली तसेच अपत्यकर घृत /अजामांस घृत यांचे बस्ती २१ दिवस दिले व नंतर अभ्यंतरतः सुद्धा घेण्यास दिले  त्याचप्रमाणे त्रिवंग भस्म + चंद्रप्रभा+ मौक्तिक पिष्टी हा योग अपान काळी अपत्यकर घृताच्या अनुपानाने घेण्यास दिला . अशाप्रकारे साधरण १२ महीने अव्याहत चिकित्सा केल्यानंतर प्रत्येक ३ /३ महीन्यानंतर केला असता शेवटच्या रिपोर्ट मध्ये ब-यापैकी सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
Male Infertility -Causes & Ayurvedic Treatments
Semen Analaysis- Count-19 mill/ml / Motility -65%/ Fructose +ve/ PH-Alkaline

यानंतर रुग्णाच्या पत्नीला गर्भधारणा झाली.. विशेष म्हणजे हा रुग्ण स्वतः आयुर्वेदिक वैद्य असल्याने त्याने संयम व विश्वास ठेवुन चिकित्सा घेतली

 

अशाप्रकारे पुरुष वंध्यत्वाच्या शेकडो केसेस आत्तापर्यंत केवळ आयुर्वेदिय उपचारांमुळेच सकारात्मक व गुणात्मक फरकाने यशस्वी झालेल्या आहेत . यामध्ये पंचकर्मचिकित्सेचाही काही रुग्णांमध्ये वापर केला. विविध प्रकारची रसौषधेही वापरली . पण आधुनिक पद्धतिने निदान व आयुर्वेदिय चिकित्सा हा क्रम वापरल्यास आपण कोणत्या रुग्णात चिकित्सा करायाची व कोणत्या रुग्णात नाही हे मात्र निश्चित करता येते. अशाने केवळ आपल्या अज्ञानाने होणारी आयुर्वेद शास्राची मानहानी जरुर टळु शकतेच पण आधुनिक उपचार करणारे (Andrologist Consultants ) सुद्धा आपल्याकडे सन्मानाने पहावयास लागतात.

पुरुष वंध्यत्व हा विषय खुप व्यापक आहे .प्रत्येक छोट्या गोष्टींचा यथायोग्य विचार केल्यास अजुन अनेक विचार मंथन होऊ शकेल . पुरुष वंध्यत्वाचा प्रत्येक रुग्ण हा वैद्यासाठी नवनवीन आव्हाने घेऊन येतो . पण आपला आयुर्वेदिय दृष्टीकोन पक्का असल्यास मात्र आधुनिक शास्त्रातील कितीही मोठमोठे शब्दभांडार घेऊन जरी रुग्ण आला तरी त्याला आयुर्वेदिय चिकित्सेचे मापदंड  लावल्यास त्याची लवकर उकल होते हे नक्की…

शुभं भवतु…..

 

वैद्य. नितिन थोरात

एम्.डी. (आयु.)

कामोठे ,नवी मुंबई